जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात आरोग्य सेवक यांच्या मार्फत कोरोना चाचणी नमुने घेण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून ते तातडीने थांबवावे व तज्ञ डॉक्टर किंवा आरोग्य टेक्निशियन मार्फत घेण्यात यावे, अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव ॲड. जमील देशपांडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना चाचणी नमुने नाकाद्वारे घेतले जातात त्याकरीता अतिशय तज्ञ व्यक्तिच ते घेऊ शकता. आरोग्य सेवक यांना कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग याबाबत दिलेले नाही. पण ग्रामीण भागात वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी सक्तीने त्यांच्या कडून काम करून घेत आहेत. एका आरोग्य सेवकाने एका दिवसाला १००/२०० पर्यंत नमुने करावे असे तोंडी आदेश दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवक भीती व दडपणाखाली काम करत आहेत.
कोरोना चाचणी नमुने तज्ज्ञांच्या हस्ते घ्यावे असे आरोग्य विभागाने आदेश काढलेले आहेत. मात्र याबाबत निष्काळजीपणा केला जात आहे. आरोग्य सेवक गेली वर्षभर सुटी न घेता निरंतर काम करत आहेत. त्यामुळे मानसिक दृष्टीने ते अगोदरच खचलेले आहेत. त्यावर वरिष्ठांचा जाच त्यांना हतबल करत आहे.
वैद्यकीय अधिकारी, कोरोना सारख्या गंभीर विषयावर आरोग्य सेवकांना तोंडी आदेश देऊन काम करून घेत असल्याचे चित्र आहे. हे आदेश वरून आले आहेत असे सांगितले जाते. कोणतेही काम लेखी आदेशानुसार दिले पाहिजे असा प्रशासकीय नियम आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. आरोग्य सेवक हा ग्रामीण आरोग्य सेवेचा कणा आहे. त्यांच्याबाबत कठोर वागणे योग्य नाही. तसेच याबाबत सविस्तर आढावा घ्यावा व आरोग्य सेवकांना योग्य न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन मनसेचे जिल्हा सचिव ॲड. जमील देशपांडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविले आहे.