बीजिंग (वृत्तसंस्था) चीनमधील संशोधकांनी कोरोना व्हायरसवरुन चीनवर होत असलेले आरोप भारताच्या माथी मारले आहेत. कोरोना व्हायरस भारतातूनच जगभरात पसरल्याचा बालिश आरोप चिनी संशोधकांनी केला आहे.
चीनच्या अकादमी ऑफ सायन्सेसमधील वैज्ञानिकांच्या एका गटाने म्हटले आहे की, बहुधा २०१९ च्या उन्हाळ्यात कोरोना विषाणूचा भारतात जन्म झाला असावा. कोरोना विषाणू जनावरांमुळे दूषित झालेल्या पाण्याद्वारे मानवांमध्ये प्रवेश करतो. भारतात तसेच झाले आणि त्यानंतर हा विषाणू चीनच्या वुहान शहरात पोहोचला. तिथेच या विषाणूची ओळख पटवण्यात संशोधकांना यश आले. भारतावर आरोप करण्यापूर्वी चीनमधील संशोधकांनी कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, याबाबतचा अभ्यास सादर केले. ज्या व्हायरसचे कमी म्युटेशन झाले आहे त्यांचा शोध घेऊन व्हायरसचा स्रोत समजू शकतो, असे या वैज्ञानिकांनी या विश्लेषणात म्हटले आहे.
चीनी संशोधक म्हणाले की, वुहानमध्ये सापडलेला कोरोना व्हायरस पहिला व्हायरस नव्हता. हा व्हायरस बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, चेक रिपब्लिक, रशिया किंवा सर्बिया यापैकी कुठल्यातरी देशात निर्माण झाला असावा. यापैकी भारत आणि बांगलादेश हे चीनच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे यापैकी एका देशातून कोरोना व्हायरसचा प्रसार होऊन तो व्हायरस वुहानपर्यंत पोहोचला असल्याची दाट शक्यता आहे. हा व्हायरस जुलै किंवा ऑगस्ट २०१९ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला असावा, असे अनेक अंदाज चिनी संशोधकांनी व्यक्त केले आहेत.