मुंबई (वृत्तसंस्था) इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेआधी भारतीय संघाच्या चिंता वाढल्या आहेत. कारण भारतीय टीममध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. टीम इंडियातील दोन प्लेअर्सला कोरोनाचा ससंर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर भारतीय संघाने प्रदीर्घ ब्रेक घेतला. जवळपास तीन आठवड्यांच्या या ब्रेकमध्ये खेळाडूंनी आपल्या कुटुंबासमवेत इंग्लंडमध्ये धमाल केली. याच दरम्यान संघातल्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यातील एक खेळाडू रिकव्हर देखील झालाय तर दुसऱ्या खेळाडूला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.
दोन्ही खेळाडूंना थंडी वाजणे, घशात खवखवणे, ताप येणे अशा प्रकारची लक्षणे होती. परंतु दोघांचीही प्रकृती आता स्थिर आहे. पहिल्या खेळाडूची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे तर दुसऱ्या खेळाडूची दुसरी कोरोना टेस्ट १८ जुलै रोजी केली जाणार आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या टीम इंडियातील प्लेअर्सचे नाव कळू शकलेले नाहीये. सध्या संबंधित प्लेयर आयसोलेशनमध्ये आहे. १८ तारखेला त्याचा आयसोलेशन मधील १० वा दिवस असेल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर लगोलग तो भारतीय संघाच्या सोबत सराव करेल.
इंग्लंडमध्ये कोरोनाचा उद्रेक
गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पहायला मिळत आहे. इंग्लंड क्रिकेट टीममधील प्लेअरला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. इंग्लंडच्या ३ प्लेअर्ससोबत सात जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.