जळगाव (प्रतिनिधी) कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. त्यामागे त्याचा सहकारी दिलीप राजू चौधरी हाच असल्याचा संशय स्वप्नील याचे वडील रत्नाकर शिंपी व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दिलीप चौधरी यांची चौकशी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी घरी सोडले आहे.
शिंपी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागुल, मुख्य सचिव संजय खैरनार, उपाध्यक्ष मुकुंद मेटकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कापुरे व विवेक जगताप आदींनी रविवारी स्वप्नीलच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या वडिलांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली.
कार असताना चौधरी याने रुग्णवाहिकेची वाट का पाहिली ?
घटनेचे विश्लेषण करताना वडील व या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वप्निल कार चालवत होता तर त्याच्या बाजूला दिलीप चौधरी बसलेला होता. या हल्ल्यात चौधरी याला जराही खरचटलेले नाही. त्याशिवाय चालकाच्या बाजूच्या सीटवर रक्त पडलेले होते व त्याच बाजूने वार झालेले आहेत. गाडी देखील रस्त्याच्या कडेला लावलेली होती. काही अंतरावर स्वप्निल यांचा शर्ट बदल करण्यात आला आहे. स्वतःची कार असताना चौधरी याने रुग्णवाहिकेची वाट का पाहिली. त्या कार मधून रुग्णालयात का हलविले नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
चौधरी याला व्यवसायाचा ताबा घ्यायचा होता
हवाल्याच्या ठिकाणाहून स्वप्नील यांनी कापसाचे कमिशन वजा करून १४ लाख ७८ हजार रुपये घेतले. त्यापैकी बॅगेत १० लाख २७ हजार रुपये शिल्लक होते. लूटमार करणाऱ्यांनी ही रक्कम का पळवली नाही. ४ लाख ५१ हजार रुपये इतकी रक्कम कमी आली आहे, ती रक्कम सुपारी घेणाऱ्यांना देण्यात आल्याचाही आरोप रत्नाकर शिंपी यांनी केला. चौधरी याला व्यवसायाचा ताबा घ्यायचा होता, त्यातूनच ही हत्या घडवून आणली आहे. दोषीला अटक व कारवाई झाली नाही तर, आंदोलन छेडण्याचा इशारा रवींद्र बागुल यांनी दिला आहे.