मुंबई (वृत्तसंस्था) डीएचएफल प्रकरणात व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयनं त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. अशातच आता अविनाश भोसले यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई सेशन कोर्टातील (Mumbai Session Court) विशेष CBI कोर्टाने उद्योगपती अविनाश भोसले यांना 30 मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर आता अविनाश भोसलेंची नजरकैदेत रवानगी करण्यात आली आहे. अविनाश भोसलेंना सीबीआयच्या बीकेसीतील विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या वकिलांना दोन दिवस सायंकाळी 5 ते 6 दरम्यान त्यांना भेटू देण्याची परवानगी देण्यात आली आहे. सीबीआयने अविनाश भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्यावतीने रिमांडला विरोध करण्यात आला. विशेष म्हणजे भोसलेंच्या रिमांडला विरोध करणारा अर्जही कोर्टात दाखल करण्यात आला. पण सीबीआयने त्या अर्जावर उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत मागितली. तसेच तोपर्यंत भोसलेंना नजरकैदेत ठेवावी, अशी मागणी केली. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर अविनाश भोसलेंना 30 मे पर्यंत सीबीआयच्या गेस्टहाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला. तसेच भोसलेंना 30 मे रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश देण्यात आले.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल गुरुवारी रात्री CBI कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.
अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.