नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अर्थव्यवस्था अडचणीत असताना रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक तीन सदस्यांची नियुक्ती न झाल्यामुळे गेल्या आठवड्यात होऊ शकले नाही. याबद्दल बरीच टीका झाल्यानंतर आज समितीच्या तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
आता नव्या पतधोरण समितीची बैठक ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून ९ ऑक्टोबर रोजी पतधोरण जाहीर होणार आहे. अशिमा गोयल, जयंत वर्मा व शशांक भिडे हे पतधोरण समितीचे नवे सदस्य असून त्यांची नियुक्ती चार वर्षांकरीता करण्यात आली आहे. पतधोरण समितीवर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर असतात. जुन्या सदस्यांची फेरनियुक्ती रिझर्व्ह बॅंकेच्या कायद्याप्रमाणे होऊ शकत नाही. रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारने महागाईचा दर चार टक्के ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टिकोनातून पतधोरण समिती आपले धोरण तयार करीत असते. सध्या महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे या पतधोरणावेळी व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी आहे. मात्र भांडवल सुलभता वाढविली जाईल.