अमळनेर (प्रतिनिधी) तांदळाची कट्टे भरलेली आयशर गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपये खंडणी मागणाऱ्या महिला पत्रकारासह आठ जणांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, इम्रान फझल हक अन्सारी (३६, खटकी पाडा, अकबर चौक, धुळे) हा ८ रोजी सायंकाळी धुळ्यातील महेश सुरेश वाणी यांच्या मालकीचे ३४६ कट्टे तांदूळ आयशर (एमएच१८/बीजी ७४५) मध्ये धुळ्यातून चोपडा येथे घेऊन जात असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सहाजण मोटरसायकलवर येऊन त्यांनी गाडी अडवून मोबाईल व गाडीची चावी हिसकावून आवाज केला तर गाडीखाली फेकून मारून टाकू, अशीही धमकी दिली. तेवढ्यात पत्रकार जयश्री दाभाडे व एकजण मोटरसायकलवर तेथे आले व तुम्ही बिनाहप्त्याचे चालतात. तुम्हाला हप्ते द्यावे लागतील. मालकाला फोन लाव आणि इथे बोलाव, असे सांगू लागले आणि गाडी परत धुळ्याकडे घेऊन जायला सांगितली. लोंढवे येथे गाडी थांबवण्यात आली. मालक महेश वाणी आल्यानंतर गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपये व दरमहा पाच हजार रुपये खंडणीची मागणी केली. चालकाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला पत्रकार जयश्री दाभाडे व त्यांच्यासोबत इतर सातजणावर खंडणी मागणे व खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणे आणि रस्ता अडवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.