मुक्ताईनगर (प्रतिनिधी) अति तापमानामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे कृषी आयुक्त आणि जळगाव जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रणी आहे. परंतु सततची नैसर्गिक आपत्ती आणि केळीला योग्य बाजारमूल्य मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक चक्रव्यूहात अडकला आहे. मार्च महिन्यात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे केळी बागा कोलमडून पडल्या होत्या मोठ्या हिंमतीने शेतकरी बांधवानी केळी बाग उभ्या केल्यानंतर आता एप्रिल ,मे च्या हिटचा तडाखा केळी बागांना बसत आहे. जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून सूर्यनारायण आग ओकत असून तापमान 42 ते 45 अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. उन्हाचा पारा चढल्याने वाढत्या तापमानाचा मोठा फटका केळी बागांना बसत आहे. केळीचे झाडे करपत तसेच अर्ध्यातून मोडून पडत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” अंतर्गत विमे काढले असून जिल्हयातील 75 महसुल मंडळात महावेधच्या नोंदी नुसार 1 ते 30 एप्रिल दरम्यान सलग 5 दिवस तापमान 42 डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळीला त्याचा फटका बसुन योजनेच्या निकषानुसार नुकसान ग्रस्त शेतकरी फळ पिक विम्याचा लाभ मिळण्यास पात्र आहे. या शेतकरी बांधवाना तात्काळ फळ पिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच अनेक शेतकऱ्यांचा मागिल हंगामातील पिक विमा मंजुर असुन सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणे अद्याप प्रलंबित आहे. ही प्रलंबित असलेली पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे कृषी आयुक्त आणि जळगाव जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, जळगाव जिल्ह्या हा प्रामुख्याने केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु सततच्या नैसर्गिक आपत्ती मुळे येथील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असुन तापमानाने 45 अंश सेल्सिअस चा आकडा गाठल्याने केळी पिकाचे मोठे नुकसान होत आहे. आधी आलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने केळीचे नुकसान झाले होते. अशा अनेक संकटातून सावरलेल्या केळीच्या बागा आता उन्हाच्या तिव्रतेमुळे पुन्हा संकटात सापडलेल्या दिसून येत आहेत. तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर गेल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
केळी पिकाला किमान 30 ते 35 अंशांदरम्यान तापमान आवश्यक असते. परंतु, सूर्य आग ओकू लागल्याने तब्बल 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमानाच्या भट्टीत या केळी बागांची कमालीची होरपळ होत आहे.उन्हाच्या चटक्यामुळे केळीचे शेंडे करपणे,पाने पिवळी पडणे पाने खाली पडणे, केळीचे घड काळे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे केळीचे वजन कमी भरत असून त्याचा उत्पन्नावर परीणाम होत आहे.त्यामुळे ऐनवेळी शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास तापमानामुळे हिरावला जात आहे. यातील बहुतांशी केळी उत्पादक शेतकरी बांधवांनी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा काढला आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार अंतर्गत केळी पिकासाठी असलेल्या निकषानुसार एप्रिल, मे महिन्यात सलग पाच दिवस 42 अंश सेल्सिअस किंवा अधिक तापमान राहिल्यास केळी उत्पादक शेतकऱ्यांना अति उष्णतेच्या निकषाअंतर्गत हेक्टरी 36000 नुकसान भरपाई देय आहे.
पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन 2023-24 मधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध वरील माहिती (डेटा) नुसार दि.1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये जळगाव जिल्ह्यातील 75 महसूल मंडळात सलग 5 दिवस तापमान 42 अंश सेल्सिअस व त्यापेक्षा अधिक राहिल्याने केळी पिकाला अति तापमानाचा फटका बसला आहे. तरी हवामान आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहारमधील निकषानुसार जिल्हयातील या 75 मंडळातील केळी उत्पादक शेतकरी रु.36000 प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. तरी पात्र केळी उत्पादक शेतकरी बांधवांना तात्काळ फळ पिक विम्याचा लाभ देण्यात यावा.
तसेच जळगाव जिल्हयातील अनेक शेतकरी बांधवांचा मागील हंगामात पिक विमा मंजुर झालेला आहे परंतु अद्यापही अनेक शेतकरी बांधवांना मंजुर पिक विम्याचा लाभ मिळालेला नाही तरी मंजुर पिक विम्याची रक्कम पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तात्काळ वर्ग करण्यात यावी, अशी मागणीही रोहिणीताई खडसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.















