जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे जगातील अनेक देशात लॉकडाऊन घोषित करावा लागला आहे. तर देशातील काही राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून दुसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी केलेले नियोजन उत्तम असून भविष्यातील धोका टाळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँक लवकरात लवकर कार्यान्वित करावी, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजार निगडित प्रतिबंधाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंडे, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, नोडल अधिकारी तुकाराम हुलवळे, बी. जे. पाटील, डॉ. रायलानी आदि उपस्थित होते.
आयुक्त श्री. गमे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूदरही नियंत्रणात येत आहे परंतु अजून कमी होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना अभिनंदनीय आहेत. असे असले तरी गाफिल राहून चालणार नाही. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने वापर करुन अधिकाधिक तपासण्या करण्यात याव्यात. तपासणी अहवाल प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या कोमॉर्बिड आणि हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात राहावे. त्यांना आवश्यकता भासल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करावे. कोमॉर्बिड रुग्णांना लक्षणे नसले तरी त्यांच्या संपर्कात राहून त्यांचेवर लक्ष ठेवावे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार चार राज्यांतून येणाऱ्या नागरीकांची तपासणी काटेकोरपणे करावी. नॉन कोविड रुग्णांना वेळेत उपचार मिळतील याचीही दक्षता घेण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्यात. शाळा सुरु करण्याबाबतचे व्यवस्थित नियोजन करावे. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी बाधित आढळून आल्यास त्यांचेवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्डचे नियोजन करावे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी. त्यांच्याकडून दंड वसूल करावा. विना मास्क खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना विक्रेत्यांनी प्रवेश देवू नये. तशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांनी विक्रेत्यांना द्याव्यात, त्याचबरोबर एखाद्या भागात वारंवार बाधित रुगण आढळून येत असतील तर त्या भागास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करुन तेथे कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. पॉझिटिव्ही रेटही कमी झाला असून रिकव्हरी रेट वाढला आहे. मृत्यू दरही कमी होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इतर कोविड सेंटरमध्ये आवश्यक तेवढे बेड तयार आहेत. जिल्हा रुग्णालयात लवकरच नॉन कोविड रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँक लवकरत लवकर कार्यान्वित केला जाईल.
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या चाचण्या करण्यात येत असून शाळांचे सॅनिटायझर करण्याचेही नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले. विना मास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. मुंडे यांनी सांगितले. तर आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रतिबंधासाठी विक्रेते, फेरीवाले यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या सेवेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या करण्याचे नियोजन केले आहे. आता फेरीवाले, विक्रेत्यांचीही चाचणी घेण्यात येणार आहे. अधिष्ठाता डॉ. रामानंद म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून मनुषयबळासह आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून वैद्यकीय महाविद्यालय सज्ज असल्याचे सांगितले. दैनंदिन चाचण्यांचे अहवाल लवकरात लवकर मिळावे यासाठीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी दिली.