मुंबई (वृत्तसंस्था) एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्याची कारकुनी चूक बँकेला चांगलीच महागात पडली आहे. कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे भलत्याच व्यक्तींच्या बँक खात्यात १.५० कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहे. यानंतर चुकीच्या लाभार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे तेलंगणा सरकारचा प्रमुख कार्यक्रम असलेल्या दलित बंधू योजनेसाठी ठेवलेल्या निधीचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले. अनुसूचित जाती कुटुंबासाठी १० लाख रुपये एकरकमी भांडवली मदत पुरविण्याचे या विशेष योजनेचे उद्दिष्ट आहे. ‘एका वृसंस्थे’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही योजना अनुसूचित जातीच्या कुटुंबांना उत्पन्नाचे योग्य स्रोत निर्माण करण्यासाठी १०० टक्के अनुदान देते. पण या योजनेचा निधी बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे भलत्याच व्यक्तींच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाला आहे. राज्य बँक २५ वर्षांसाठी कारखाने देणार भाडेतत्त्वावर या योजनेचा निधी बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे लोटस हॉस्पिटलच्या १५ कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार म्हणून १.५० कोटी रुपये ट्रान्सफर झाला. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात १० लाख रुपये जमा झाले. यानंतर चुकीच्या लाभार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घोळ लक्षात येताच तेलंगणातील एसबीआयच्या रंगारेड्डी जिल्हाधिकारी कार्यालय शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही चूक कबूल केली. त्यांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना चुकून ट्रान्सफर झालेली रक्कम परत करण्यास सांगितले.
मीडिया रिपोर्टनुसार, १५ पैकी १४ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत केले. परंतु महेश नावाच्या एक व्यक्तीशी फोनवर संपर्क झाला नसल्याने त्याच्याकडून संपूर्ण रक्कम परत मिळालेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महेशने असे गृहीत धरले की त्याच्या बँक खात्यात १० लाख रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केले आहेत आणि म्हणून त्याने त्याचे कर्ज फेडण्यासाठी यातील काही रक्कम बँक खात्यातून काढून घेतली.
वारंवार विनंती करूनही महेशने पैसे परत केले नसल्याचे ‘एका वृत्तसंस्थेने’ वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर बँक अधिकाऱ्याने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या चुकीबद्दल बँक कर्मचाऱ्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. आतापर्यंत महेशच्या खात्यात हस्तांतरित झालेल्या १० लाख रुपयांपैकी ६.७० लाख रुपये परत मिळवण्यात बँक अधिकाऱ्यांना यश आले आहे. उर्वरित ३.३० लाख रुपये त्याने एसबीआयला परत करायचे आहेत.