औरंगाबाद (वृत्तसंस्था) बायकोला माहेरी सोडायला आलेल्या नवऱ्यानेच १७ वर्षीय मेहुणीला सासरवाडीहून पळवून नेल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील घोंदलगाव गावात ही धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी जावयासह त्याच्या साथीदाराविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोंदलगाव येथील एका कुटुंबातील मुलीचे लग्न दीड वर्षापूर्वी तालुक्यातीलच कापूसवाडगाव येथील युवकाशी झालं. सासुरवाडी जवळ असल्याने जावयाचं नेहमी सासुरवाडीला येणं-जाणं सुरू होतं. त्यामुळे जावई आणि सासरच्या मंडळींची चांगलीच जमली होती. पण हाच जावई आपल्या एक दिवस आपल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेईल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. पण जावयाने जे केलं त्यानंतर सासरच्या मंडळींना सुद्धा मोठा धक्का बसला.
9 मे रोजी आरोपी युवक आपल्या पत्नीला माहेरी सोडण्यासाठी घोंदलगाव येथे मुक्कामासाठी आला. मुलगी आणि जावई आल्यानंतर सासरच्या मंडळींनी सुद्धा थाटामाटात त्यांना जेवण बनवलं. त्यानंतर सर्व कामे आटोपून सासरची मंडळी झोपी गेली. सकाळी सदरील कुटुंब जागे झाल्यानंतर जावयासह त्यांची अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी घरातून गायब झालेली त्यांना दिसली. त्यानंतर त्यांनी गावातील नातलगांसह आजूबाजूला दोघांचाही शोध घेतला. परंतु ते सापडले नाही.
दरम्यान, मुलीचा शोध सुरू असतानाच सासरच्या मंडळींना आरोपी जावयाचा फोन आला. मी तुमच्या मुलीला रात्री 12 वाजता घेऊन आलो आहे. आम्हाला लग्न करायचे आहे 10 हजार पाठवा अशी मागणी या जावायाने केली. जावयाने केलेलं हे कृत्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून करामती जावई आणि त्याच्या मित्रांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















