नांदेड (वृत्तसंस्था) नांदेड (Nanded) शहरातील चिरागगल्ली येथील एका तरुणानं आपल्या धाकट्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. नराधम आरोपीनं लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Inhuman beating) करत लहान भावाचा जीव घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून आरोपी भावाला अटक केली आहे.
अरुणसिंह बालाजीसिंह ठाकूर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो नांदेड शहरातील चिरागगल्ली परिसरातील रहिवासी होता. तर जुगनूसिंह ठाकूर असं मारेकरी भावाचं नाव आहे. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी आई गंगाबाई ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाला अटक करून त्याला न्यायालयात दाखल केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुगनूसिंह यानं घटनेच्या दिवशी २३ फेब्रुवारी रोजी आपला धाकटा भाऊ अरुणसिंह यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. पण अरुणसिंह यानं पैसे देण्यास नकार दिला. यामुळे मोठ्या भावाला संताप अनावर झाला. याच कारणातून त्याने अरुणसिंहला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की, यामध्ये अरुणसिंहचा जागीच मृत्यू झाला. हत्येची ही थरराक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच इतवारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आई गंगाबाई ठाकूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा जुगनूसिंह ठाकूर याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. दारूच्या पैशांसाठी लहान भावाचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.