नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज (ता. 14 फेब्रुवारी) पासून सर्वोच्च न्यायालयात रोज सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय निकाल लागणार ?, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर घटनापीठापुढे मंगळवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने ७ सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्याची केलेली मागणी घटनापीठापुढे मान्य होईल काय? याकडे लक्ष लागले आहे. तूर्त पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्यास निकाल येण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागेल असे तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे.
यापूर्वी १० जानेवारीला झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या खटल्याची सुनावणी ७ सदस्यीय घटनापीठापुढे व्हावी, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ सदस्यांना विधानसभेचे उपाध्यक्षांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यघटनेच्या अनुसूची १० मधील तरतुदींची व्याप्ती, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाचारण करणे, विधानसभा अध्यक्षांची निवड, विधानसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोदाची निवड या वादांवर या घटनापीठापुढे दोन्ही बाजूंनी युक्तिवाद अपेक्षित आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे काय निर्देश असतील. पुढे काय होणार, शिंदे सरकारचे भवितव्य काय असेल. याकडे शिवसेनेच्या दोन्ही गटासह संपूर्ण देशाच लक्ष लागले आहे. शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका ही लिस्ट झाली असून सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. या खटल्याची सुनावणी सध्या ५ सदस्यीय घटनापीठापुढे सुरू आहे. यात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्याशिवाय न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.