जळगाव (प्रतिनिधी) पुतण्याच्या लग्नासाठी राजस्थानला गेलेल्या सुरेश हिराराम सोलंकी (वय ४१, रा. सावित्रीनगर) या सोनारी कारागिराच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. त्यांच्या घरातील कपाटाच्या लॉकरमधून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण २ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दुचाकीवर तोंड बांधून आलेल्या चोरट्यांनी घरफोडी केल्याची परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.
शहरातील एसटी वर्कशॉप परिसरातील सावित्री नगरात सुरेश हिरााम सोलंकी हे वास्तवयास असून तयांचे बालाजी पेठेत सोनारी कामाचे दुकान आहे. त्यांच्या पुतण्याचे दि. १५ रोजी सोलंकी कुटुंबिय कार्यक्रमासाठी राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी घरातील सर्व सोने चांदीचे दागिने आणि रोकड किचनमधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते. त्यानंतर घराच्या संपुर्ण दरवाजासह मुख्य लोखंडी दरवाजाला देखील कुलूप लावले होते. दि. २५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी राहणारे गोविंद मेघवाल आणि कमलाकर चौधरी यांनी सोलंकी यांना फोन करुन तुमच्या घराचे कुलूप तुटून घरात चोरी झाल्याचे दिसत असल्याचे सांगितले.
घरफोडी झाल्याचे कळताच गाठले जळगाव
लॉकरमध्ये ठेवलेला ऐवज दिसत नसल्याचे सांगितल्यानंतर सोलंकी हे लागलीच राजस्थानहून जळगावला येण्यासाठी निघाले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते घरी पोहचल्यानंतर त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेला ऐवज बघितला. त्यावेळी त्यांना चोरट्याने त्यांच्या घरातून रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने चोरुन नेल्याची खात्री झाली.
चोरट्यांनी लांबवून नेला ऐवज
चोरट्यांन सोलंकी यांच्या घरातून ८० हजार रुपयांचे १ किलो चांदीचे २० पैंजनाचे जोड, ३० हजारांचे २० चांदीचे शिक्के, ३० हजारांचे २ सोन्याचे शिक्के, ४० हजारांची रोकड आणि २० हजारांचे २ कानातील सोन्याचे जोड असा एकूण २ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सुरेश सोलंकी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राहूल तायडे करीत आहेत.
२२ मिनिटात चोरी, दुचाकीवरुन पसार
घरात चोरी झाल्यानंतर सोलंकी यांनी त्यांच्या कॉलनीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासले. यावेळी त्यांना पहाटे ३ वाजून ८ मिनिटांनी दोन चोरटे तोंडाला कापड बांधून दुचाकीनेत्याठिकाणी आले. त्यांनी सोलंकी यांच्या घराच्या लोखंडी गेटसह मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर ३ वाजून ३० मिनीटांनी चोरटे त्यांच्या घरातून बाहेर जातांना दिसून आले. ते फुटेज एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानुसार पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.