बोदवड (प्रतिनिधी) अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले गेले आहे. तसेच काहींची जीवितहानी होता होता राहिली असून काहींना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. सदर बोदवड तालुक्यातील घाणखेड, निमखेड व एणगांव तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा, रिगांव, चिंचखेडा या गावांमध्ये नुकसानग्रस्त शेती तसेच राहत्या घरांची खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त व जखमी, शेतकरी व नागरिकांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडे पाठपुरावा करून, लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील चैतन्य हनुमान मंदिर येथे गौशाळेचे छत उडुन जाऊन २ गाईंचा मृत्यू झाला तर काही जखमी झाल्या, तसेच महंत दरबार पुरी महाराज व ४ भक्तांना झाडपडून गंभीर दुखापत झाली, त्यांची खासदारांनी भेट घेऊन विचारणा केली. तसेच चिंचखेडा गावाला सदिच्छा भेट देऊन ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बोदवडच्या नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, माजी बाजार समिती सभापती अनिल रामचंद्र वराडे, तालुका सरचिटणीस राजू डापसे, गट प्रमुख सुधिर पाटील, विनोद कोळी, सरपंच पल्लवी पाटील, विकास करांडे, सुभाष वराडे, उपसरपंच निलेश करांडे, ग्रा.प.सदस्य कल्पना बोरले, रमेश सुरंगे, सचिन बोंडे, यांच्यासह तहसीलदार प्रथमेश घोलप, गट विकास अधिकारी नागतिलक साहेब, तलाठी वैभव उगले, मंडळ कृषी अधिकारी नूतन लांडगे तर मुक्ताईनगर दौऱ्यात माजी जि.प.अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, प. स. सदस्य राजेंद्र सवळे, विनोद पाटील, रवी राजपूत इ. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.