भोपाळ (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण करणारा आणि त्यातून मूल झाल्यावर जबाबदारी सोडून पळ काढणाऱ्या एका तरुणामुळे तरुणी रस्त्यावर आली आहे. एवढंच नाही तर आपलं लग्न झाल्याची माहिती लपवून ठेवली.
मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये निलेश नावाच्या एका तरुणाची पीडित तरुणीसोबत ओळख झाली. काही दिवसांतच त्यांची ओळख वाढली आणि ही तरुणी तरुणाच्या प्रेमात पडली. दोघांनी एक भाड्याचं घर घेऊन तिथं एकत्र राहायला सुरुवात केली. या काळात आपण विवाहित असल्याची माहिती या तरुणाने लपवून ठेवली. काही दिवसांनी ही तरुणी गर्भवती राहिली. ती सात महिन्यांची गर्भवती असताना हा तरूण अचानक घर सोडून पळून गेला. पत्नी गर्भवती असताना तरुण पळून गेल्यानंतर या महिलेनं एका मुलीला जन्म दिला. ही मुलगी ५ महिन्यांची झाल्यावर तो पुन्हा परतला. आपण विवाहित असून आपल्याला एक मुलगा असल्याची कबुली या तरुणानं दिली. मात्र तरीही तरुणीसोबत लग्न करून दुसरी पत्नी म्हणून नातं पुढे सुरु ठेवायला त्यानं तयारी दाखवली. पुढची तीन वर्षं तो या महिलेसोबत राहिला आणि त्यानंतर पुन्हा गायब झाला. तरुणी कमावती नसल्यामुळे घरभाडं भरणं तिला शक्य होत नव्हतं. अखेर घरमालकांनी तिला निलेशच्या मूळ गावी नेलं.
गोसलपूरमध्ये या तरुणीला पाहताच तिला स्विकारणं तर दूरच, पण निलेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला आणि घरमालकाला बेदम मारहाण केली. निलेशची पत्नी, आई आणि भावानं या तिघांना चोप देऊन तिथून हाकलून दिलं. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यासाठी ही तरुणी गेली असता पोलिसांनी तिच्याच चारित्र्याबाबत संशय व्यक्त करत तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचं तिनं सांगितलं आहे.