पिंपळगाव हरेश्वर (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील लोहारी बु येथील नवीन प्लॉट भागातील एका घरातून रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण २ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मुकुंदा आनंदा पाटील (वय ५१ रा. लोहारी बु जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २३ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११.०० वाजेच्या सुमारास मुकुंदा पाटील हे घराच्या गच्चीवर झोपलेले होते. रात्री मेन गेटच्या दरवाजाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूम मधील गोदरेजच्या कपाटातील लाँकरचा पत्रा वाकवून आतमध्ये ठेवलेले विविध सोन्या चांदीचे दागिने व २७ हजार रोख रक्कम, असा एकूण २ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.