भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मुस्लीम कॉलनीत घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी 50 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सलीम शाह हुसेन शाह (55, उमर कॉलनीजवळ, भुसावळ) हे नोकरदार असून 13 ते 16 दरम्यान कामानिमित्त कुटूंबासह बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी 22 हजार 800 रुपये किंमतीचे चांदीचे 40 भार दागिणे, 23 हजार रुपये किंमतीचा एलसीडी टीव्ही, एक हजार रुपये किंमतीची इंडक्शन शेगडी, तीन हजार रुपये किंमतीचे एचपी कंपनीचे दोन सिलिंडर असा एकूण 49 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. शाह हे कुटूंबासह घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यनंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व सहकार्यांनी पाहणी केली. तपास हवालदार समाधान पाटील करीत आहेत.