जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विजय कॉलनीतील प्रसाद अपार्टमेंटमध्ये धाडसी घरफोडी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ४ लाख ३० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद अपार्टमेंटमधील रहिवासी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहेत. गुरूवारी दुपारी व्यास हे कामावर होते. तर कुटूंबिय खरेदीसाठी बाहेर गेले होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास व्यास यांचा मुलगा ध्रुव हा घरी आला. त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केल्यानंतर कपाट सुद्धा तुटलेले दिसले. हा प्रकार त्याने वडिलांना सांगितला. व्यास हे घरी आल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेले तर आतील खोलीतील कपाट, कपाटातील ड्रॉव्हर तुटलेले व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे डबे बेडवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले. व्यास यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. रात्री व्यास यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अज्ञात चोरट्यांनी घरातील १ लाख ८० हजार रूपयांची रोकडसह ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगळपोत, ८० हजार रूपयांची सोन्याची चेन, ६० हजार रूपये किंमतीचे कानातील पैंडल, ८ हजार रूपये किंमतीची सोन्याची फुली, १२ हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ, २ हजार रूपये किंमतीची चांदीची साखळी, ८ हजार रूपये किंमतीचे चांदीचे शिक्के असा एकूण ४ लाख ३० हजार रूपयांचा ऐवज लांबविला आहे.