जळगाव (प्रतिनिधी) पत्नीची प्रसूती झाल्याने रुग्णालयात गेलेले अमोल कृष्णा पाटील (२५) यांच्या घरातून रोख ७० हजार रुपयांसह तीन तोळे सोने चोरून नेले. तसेच याच परिसरातील प्रताप काशिनाथ पाटील हे कुटुंबियांसह शिरपूर येथे लग्नासाठी गेलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. या घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्या. एकाच परिसरातील दोन घरे फोडल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील जानवे येथील अमोल पाटील हे एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून नोकरीस आहे. निमखेडी शिवारातील प्रबोधन नगरात आई, पत्नीसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी (२० डिसेंबर) खासगी रुग्णालयात त्यांच्या पत्नीची प्रसूती झाल्यामुळे अमोल पाटील व त्यांची आई हे रात्रभर तेथेच थांबून होते. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते अंघोळीसाठी घरी आले असता घराचा लोखंडी दरवाजा आणि मुख्य लाकडी दरवाजाचे कडीकोयंडा तुटलेले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेला होते.
लोखंडी कपाटातील सर्व साहित्य फेकण्यात आले होते व त्याचे लॉकर तोडून त्यातून तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख ७० हजार रुपये चोरुन नेल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. घटनास्थळी तालुका पोलिसांनी जाऊन पाहणी केली. तसेच या वेळी श्वान पथकामार्फतही तपासणी करण्यासह ठसे तज्ज्ञांचे पथकही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री उशिरा तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल पाटील यांच्या घरात चोरी होण्यासह तेथून जवळच असलेल्या वैष्णवी पार्कमध्ये राहणारे प्रताप काशिनाथ पाटील यांच्या घरातही चोरी झाली. पाटील कुटुंबीय मुलीच्या लग्नासाठी शिरपूर येथे गेले असताना चोरट्यांनी संधी साधली. तेथून नेमका किती मुद्देमाल गेला, हे स्पष्ट होऊ शकले नाही.