अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील अट्टल गुन्हेगार शिवम मनोज देशमुख उर्फ दाऊदची पोलिसांनी धिंड काढल्यापासून तो काहीसा शांत होता. परंतू दाऊद विरुद्ध पुन्हा एकदा जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाऊदविरुद्ध त्याच्या सासूने गावठी कट्ट्याच्या धाकावर घरात घुसून जबरी चोरी करण्यासह मुलीला आणि नातीला जबरदस्ती गाडीवरून बसवून घेऊन गेल्याची तक्रार दिली आहे.
दाऊद विरुद्ध अमळनेर व चाळीसगाव शहरात साथीदारांच्या मदतीने लोकांना हेरून बेदम मारहाण करून दरोडा टाकणे, एकट्यादुकट्या माणसाला गाठून रस्त्यात लुटण्याचे २३ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. दरम्यान, २० सप्टेंबर रोजी दाऊद हा आपल्या सासरवाडी प्रताप मिल कंपाऊंड भागात गेला होता. यावेळी दाऊदने गावठी कट्टा सोबत आणत बळजबरीने प्रवेश करुन सासू,सासरे आणि पत्नीला शिवीगाळ केली. तसेच मी बाळाला गटारीत टाकुन देईन, अशी धमकी देत पैशांची मागणी करू लागला. यानंतर त्याने घराची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. कपाटात ठेवलेले कानातील ४ ग्रॅम वजनाचे २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल बळजबरीने हिसकावुन घेतले. तसेच तुम्ही माझ्या नांदी लागुन नका मला संपुर्ण अमळनेर घाबरते. मी दाऊद आहे. तुम्ही माझ्याविरोधात पोलीसात तक्रार दिली तर मी तुम्हा सर्वांन याच कट्याने मुडदा पाडीन अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर मुलगी व नात अशांना गुलमोहर कॉलनी भागातून मोटार सायकल चोरुन त्या मोटार सायकलवर बसवून घेवून गेला. याप्रकरणी शिवम मनोज देशमुख उर्फ दाऊद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अनिल भुसारे हे करीत आहेत. दरम्यान, कौटुंबिक विषय असल्याने आपल्या पत्नीने तक्रार घेतल्याची माहिती शिवमने रात्री उशिरा दिली. परंतू या वृत्ताला अमळनेर पोलिसांनी दुजोरा दिलेला नाहीय.
फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी काढली होती धिंड
रस्त्यावर नागरिकांना आडवून बेदम मारहाण करून बळजबरीने लूटमार करणाऱ्या दाऊद आणि त्याच्या साथीदाराला अटक करून अमळनेरमध्ये त्यांची धिंड काढण्यात आली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी आणि त्यांची दहशत कमी होण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात हे कठोर पाऊल उचलले होते. तेव्हापासून दाऊद शांत देखील झाला होता. परंतू पुन्हा एकदा त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, हा कौटुंबिक विषय असल्यामुळे दाऊद आणि त्याची पत्नी समोर आल्यावर काय जबाब देतात यावर सर्व अवलंबून असल्याची माहिती पो.नी. जयपाल हिरे यांनी दिली आहे.