अहमदनगर (वृत्तसंस्था) प्रसूतीसाठी पत्नीला रुग्णालयात न नेता घरीच प्रसूती केल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना सारसनगर परिसरात घडली. या प्रकरणी विवाहितेच्या भाऊच्या तक्रारीनंतर पतीसह सासू- सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयत विवाहितेचा भाऊ दीपाजी चेड्या काळे (रा.वाकोडीफाटा) यांच्या फिर्यादीनुसार त्यांची बहीण अनिता हिचा विवाह नीलेशसोबत १६ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांना दोन मुली व एक मुलगा अशी तीन मुले आहेत. बहिण चौथ्यांदा गरोदर होती. तिला त्रास होऊ लागल्याने सासरच्यांनी रुग्णालयात न नेता तिची घरीच प्रसूती केली. त्यात तिचा मृत्यू झाला.
गर्भवती असतांना तिला औषध उपचाराची गरज असतानाही पतीसह सासू सासऱ्याने यांनी तिला निष्काळजीपणे उपचारकामी हॉस्पिटलला नेले नाही. तिची घरीच प्रसुती केली. यादरम्यान तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला. तसेच अनिता सासरी नांदत असताना तिला सासरचे लोक त्रास देत होते, असेही तक्रारीत म्हटले आहे.
संतप्त नातेवाइकांनी अनिताचा मृतदेह पोलिस ठाण्यात आणत पतीच्या निष्काळजीपणामुळेच अनिताचा मृत्यू झाला असून, त्याला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी पती नीलेश ढेपस्या चव्हाण, सासरा ढेपस्या चव्हाण, सासू कल्पना चव्हाण (सर्व राहणार मार्केटयार्ड पाठीमागे, सारसनगर) यांच्या विरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बाळ सुरक्षित आहे.
















