नागपूर (वृत्तसंस्था) आलागोंदी येथील वाघोबा देवस्थानात धार्मिक कार्यक्रमासाठी आलेले दोघे शेजारील पळसाच्या झाडाखाली बसले होते. दरम्यान, आलेल्या वादळी पावसात पळसाच्या झाडावर वीज कोसळून त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१२ मे) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. धार्मिक कार्यादरम्यान अस्मानी संकटाने जीव घेतल्याने संपूर्ण आलागोंदी गावात शोककळा पसरली आहे.
भागवत दौलत भोंडवे (५५, रा. उतखेड, ता. वरुड, जि. अमरावती) व जयदेव नभू मनोटे (६०, रा. कलामगोना, ता. जि. बैतुल), अशी मृतकांची नावे आहेत. ते उत्तमराव पंचभाई, मु. उदापूर ता. वरुड, जि. अमरावती यांच्याकडून आलागोंदी येथील वाघोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. कोंढाळीलगतच्या आलागोंदी येथील गोविंदराव पंचभाई यांच्या शेतात हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला विविध ठिकाणांहून अंदाजे ५० जण उपस्थित होते. काही नातेवाईक व मित्रमंडळी शेतात आले होते. अचानक दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडासह वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी कार्यक्रमाला आलेले लोक झाडाखाली थांबले. त्यातच मृतक भगवंतराव भोंडवे व जयदेव मानोटे एका पळसाच्या झाडाखाली थांबले होते.
या पळसाच्या झाडावर वीज पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. आलागोंदीचे पोलीस पाटील राजेंद्र कराडे यांनी घटनेची माहिती कोंढाळी पोलिसांना दिली. ठाणेदार राजकुमार त्रिपाठी पोलीस ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मृतकांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी काटोल ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले. घटनेचा तपास ठाणेदार राजकुमार त्रिपाठी करीत आहे.
















