नांदेड (वृत्तसंस्था) येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. मृतांत १२ नवजात बालकांचा समावेश होता. मात्र, या रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरुच असून, पुन्हा 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात ३० सप्टेंबरच्या रात्रीपासून हे मृत्यूसत्र सुरू झाले. मरण पावलेल्या २४ रुग्णांमध्ये सहा नवजात बालिका आणि सहा नवजात बालकांचा समावेश आहे. मृत २४ जणांपैकी १२ जणांचा मृत्यू सर्पदंश आणि विषबाधा यामुळे झाला होता. रुग्णालयात आणखी ७० रुग्ण गंभीर आहेत. मृतांमध्ये बाह्यरुग्णांचा समावेश आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटने औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयांना वेळेवर औषध पुरवठा होत नसून, अनेक जीवनावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर हे घडल्याची माहिती समोर येत आहे.
अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये 4 बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी,” असे चव्हाण म्हणाले आहेत. “मला माहिती मिळताच मी कालच रुग्णालयात जाऊन आलो आहे. तेथील परिस्थिती अतिशय गंभीर असून, धक्कादायक आहे. ज्या काही घटना घडत आहे, त्यावर अजूनही नियंत्रण आलेलं नाही. काल 24 लोकांचा मृत्यू झाला होता, आज पुन्हा रात्रभरात 7 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे 31 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे आतापर्यंत समोर येत असल्याचे,” अशोक चव्हाण म्हणाले आहे.
सदर घडलेल्या प्रकारानंतर चौकशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.