नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली. गेल्या २४ तासांत देशात १८ हजार १६६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २१४ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवरीनुसार, देशात शनिवारी १८,१६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २३,६२४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर शनिवारी दिवसभरात २१४ कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर कोरोनाच्या सुरुवातीपासून देशात एकूण तीन कोटी ३९ लाख ५३ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी ४ लाख ५० हजार ५८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३२ लाख ७१ हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे दोन लाख आहे. एकूण २ लाख ३० हजार ९७१ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, भारतात शनिवारी १२,८३,२१२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. देशात एकूण ५८,२५,९५,६९३ नमुने चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत भारतात ९४.७० कोटी लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. देशातील साप्ताहिक सकारात्मकता दर १.५७ टक्के आहे, जो गेल्या १०७ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. देशात संक्रमणाचा दररोजचा दर १.४२ टक्के नोंदवला गेला, जो गेल्या ४१ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल (शनिवारी) २ हजार ४४६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ४८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९९ हजार ४६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के आहे. दरम्यान, राज्यात काल (शनिवारी) ४४ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा झाला आहे.