नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास २ हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत २६ हजार ०४१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २७६ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी देशभरात २६ हजार ४१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून २७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २९ हजार ६२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील रिकव्हरी रेट सध्या ९७.७८ टक्क्यांवर आहे. नवीन कोरोना रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ३६ लाख ७८ हजार ७८६ झाली आहे. त्यापैकी ३ कोटी २९ लाख ३१ हजार ९७२ जण कोरोनातून बरे झाले असून ४ लाख ४७ हजार १९४ जणांना या विषाणूमुळे जीव गमवावा लागला आहे. तर देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाखांपेक्षा कमी झाली आहे. देशात सध्या २ लाख ९९ हजार ६२० रुग्ण उपचाराधीन आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ३८ लाख १८ हजार ३६२ जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत ८६ कोटी १ लाख ५९ हजार ११ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.
राज्यातील स्थिती
राज्यात रविवारी ३ हजार २०६ नवे रुग्ण आढळून आले असून ३६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच ३ हजार २९२ बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.२४ टक्के तर, मृत्युदर २.१२ टक्के इतका आहे. नवीन रुग्णांच्या नोंदीसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६५ लाख ४४ हजार ३२५ वर पोहोचली आहे. तर, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ३८ हजार ८७० जणांचा मृत्यू झाला आहे.