नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता दिल्ली सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. १ मेपासून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जाईल, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लसीकरण वेगाने व्हावं यासाठी दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. १ मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं. मोफत लसीकरणाचा दिल्लीतील सामान्य जनतेला फायदा होईल असंही त्यांनी पुढे सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लसींच्या दरावरून टीकेची झोड उठवली. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहीजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. लस निर्मिती करण्य़ाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, १५० रुपये फायदा होतो. मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहीजेत अशी सूचनाही केली.