जळगाव प्रतिनिधी : प्रभागातील विकासकामे पारदर्शकपणे व्हावीत आणि नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवता याव्यात यासाठी ‘नगरसेवक डायरी’ योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्या उद्या महापौर, उपमहापौर व आयुक्त यांना निवेदन देणार आहेत.
महानगरपालिकेमार्फत सन २०१३ ते २०१८ या कालावधीत ‘नगरसेवक डायरी’ ठेवण्यात येत होती. या डायरीमध्ये वॉर्डातील फवारणी, गटार साफसफाई, रस्ते स्वच्छता आदी कामांची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येत आणि त्यानंतर संबंधित नगरसेवकांचीही स्वाक्षरी केली जात असे.
या पद्धतीमुळे वॉर्डात प्रत्यक्षात कोणती कामे झाली याची अधिकृत व पारदर्शक माहिती उपलब्ध होत होती. तसेच अपूर्ण किंवा निकृष्ट कामांवर तत्काळ लक्ष देणे शक्य होत होते. नागरिकांचा प्रशासनावर विश्वास वाढण्यासही या योजनेचा मोठा फायदा झाला होता.
मात्र सध्या अशी नोंद पद्धत नसल्यामुळे अनेकदा कामे झाल्याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे नगरसेविका पाटील यांनी नमूद केले आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी तसेच कामकाजात पारदर्शकता वाढवण्यासाठी ‘नगरसेवक डायरी’ योजना तात्काळ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही
नगरसेवक डायरीमुळे प्रभागातील नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. कर्मचाऱ्यांना कामाच्या संदर्भात शिस्त लागेल. प्रभागातील कामांमध्ये पारदर्शकता निर्माण होईल. तसेच, यामुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यास निश्चितच मदत होईल.















