नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने एक मोठी घोषणा केली आहे. २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसमोर निदर्शने केली जाणार आहेत.
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास या दिवशी सात महिने पूर्ण होत आहेत. या निमित्त ही निदर्शने केली जात आहेत. शेतकरी २६ जून रोजी विरोध प्रदर्शनावेळी विविध राज्यांमधील राज्यभवनाबाहेर निदर्शने करतील व काळे झेंडे दाखवतील. तर, संयुक्त किसान मोर्चा प्रत्येक राज्याच्या राज्यपालाच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठवेल. तसेच, हा दिवस शेती वाचवा, लोकशाही वाचवा दिवस म्हणून देखील पाळला जाणार असल्याचं ऑल इंडिया किसान सभेचे इंद्रजित सिंग यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी संघटना यांच्यातील बोलणी जानेवारीपासून ठप्प झालेली असतानाच, या शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांना असलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी संवाद पुन्हा सुरू करण्याची तयारी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बुधवारी दाखवली. तथापि, हे कायदे रद्द करण्यात यावेत आणि किमान हमीभावांबाबत कायदेशीर खात्री द्यावी या मागण्यांवर शेतकरी संघटना अद्याप अडून आहेत.
















