पारोळा (प्रतिनिधी) सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेतांना सजा चोरवड येथील तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३४) व खासगी पंटर शरद प्रल्हाद कोळी (वय ४३, रा. चोरवड, ता. पारोळा) यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील तक्रारदाराची साडेसहा एकर शेती आहे. त्या शेत जमिनिवर तक्रारदाराने गावातील विविध कार्यकारी सोसायटी मधून कर्ज घेण्यासाठी सदर शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावर बोजा चढवणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदार यांनी लोणी बुद्रुक गावाचे तलाठी यांची चोरवड येथील कार्यालयात जाऊन दि. ४ सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. त्यांनी कामासंदर्भात तलाठी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी तलाठी यांनी तक्रारदाराला तुमच्यावर कुटुंबीयांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्याचा मोबदल्यात चार उताराचे प्रत्येकी दोनशे प्रमाणे आठशे तर मागील कामाचे दोनशे असे एकूण हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते.
तलाठी यांनी लाच मागितल्यानंतर तलाठी यांचा पंटर शरद कोळी याने लाचेच्या मागणीला प्रोत्साहन देवून लाचेची रक्कम फोनपेद्वारे मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून सोमवारी तलाठ्यासह पंटरला हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिनेशसिंग पाटील, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोकॉ प्रदीप पोळ, रविंद्र घुगे, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, किशोर महाजन, प्रणेश ठाकूर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.