जळगाव (प्रतिनिधी) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे सांगत फसवणूक १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयांमध्ये फसवणूक करणाऱ्याच्या मागावर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक होते. या पथकाने ठाणे येथे एका घरात लपून बसलेल्या तोतया पीए हितेश रमेष संघवी (४९, रा. नवी मुंबई) याला ठाणे येथे दि. २४ रोजी रात्रीच्या सुमारास बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने दि. ३० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तत्कालीन एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत हितेश रमेश संघवी (वय ४९) याने रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्यासह म्हाडामध्ये फ्लॅट देणे व इतर वेगवेगळे आमिष दाखवून १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केली. या प्रकरणात हितेश हा वेगवेगळे अमिष दाखवायचा तर त्याची पत्नी अर्पिता संघवी ही कागदपत्रे जमा करीत असे. या प्रकरणी दि. ८ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. फसवणुक करणाऱ्या तोतया पीएची पत्नी अर्पिता संघवी हीला मुंबई येथून अटक केली असून ती न्यायालयीन कोठडीत आहेत.
पोलीसांना देत होता गुंगारा
पत्नीला पोलीसांनी अटक केल्यानंतर संशयित हितेश संघवी हा पोलिसांना गुंगारा देत होता. तोतया पीए संघवी हा ठाणे येथील एका घरात लपून बसल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोहेकॉ निलेश सुर्यवंशी, घनश्याम पवार, ईश्वर धनगर यांचे पथक रवाना केले. या पथकाने ठाणे येथून रविवारी रात्रीच्या सुमारास हितेश संघवी याला अटक केली.
३० पर्यंत पोलीस कोठडी
तोतया पीए हितेश संघवी याला अटक केल्यानंतर रात्रीतून त्याला जळगावात आणले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दि. ३० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.