बेळगाव (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सदाशिवनगर बंगळूर इथे घडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. आज शिवाजी उद्यानापासून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरण्या बरोबरच राजांच्या पुतळ्याला अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षी मनगुत्ती येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात हटविण्यात आला होता. तेव्हापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम कन्नड संघटनांकडून केले जात आहे. गुरुवारी रात्री सदाशिनगर बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून महाराजांचा अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला.
या घटनेचा निषेध करण्यासाठी हजारो शिवप्रेमी धर्मवीर संभाजी चौक येथे जमा झाले. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी या भागातील सर्व रस्ते रोखून धरले तसेच समाजकंटकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांकडून शांत राहण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध करीत दगडफेक करण्यास सुरुवात केली.