मुंबई (वृत्तसंस्था) हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जंयती. या निमित्त विविध स्तरांतून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास व्हिडिओ शेअर करून बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे व विचारांचे कौतुक करून फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यासोबत बाळासाहेबांच्या काही भाषणांसह आपल्या भाषणांतील काही वाक्येही या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शेअर केली आहे.
बाळासाहेबाचं मन हे राजासारखं होतं. निवडणूक हरो किंवा जिंको, बाळासाहेब जे चैतन्य निर्माण करायचे ते अप्रतिम होते. ते येऊन गेले की जिंकल्याची मजा यायची. ही त्यांची ताकद होती. असे फडणवीस म्हणाले. आम्ही कुठेही असो तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकेर हे आम्हाला आदरस्थानीच राहतील. त्यांच्या विचारासाठी संघर्ष करत राहू. तुम्ही त्यांच्या विचारात मिसळ केली असेल, आम्ही नाही केली. बाळासाहेब हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमहत्व होतं. अशा शब्दात फडणवीसांनी टोला लगावला आहे. चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचं वर्णन केलं आहे. बाळासाहेबांच्या काही भाषणांसह स्वत:च्या भाषणांतील काही वाक्येही या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शेअर केली आहेत. ‘अलीकडच्या राजकारणात नेत्यांची मनं छोटी-छोटी होतात. ते आपल्यापलीकडं पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांचं मन देखील राजासारखं होतं. निवडणूक हरो किंवा जिंको, बाळासाहेब जे चैतन्य निर्माण करायचे ते अप्रतिम होतं. ते येऊन गेले की जिंकल्याची मजा यायची. ही त्यांची ताकद होती,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘जनतेनं विश्वासानं तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशासाठी? पैशाचे लाचार व्हाल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. भगवा झेंडा हातात ठेवू नका. हे गुण मराठ्यांच्या रक्तात असता कामा नयेत. तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. तुमच्याकडं आदरानं लोक पाहताहेत तो आदर तसाच ठेवा…’ बाळासाहेबांच्या भाषणातील ही निवडक व सूचक वाक्य फडणवीस यांनी शेअर केली आहेत.
दरम्यान, आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेब आपल्या ध्येयापासून कधीच ढळले नाहीत. त्यांनी लोकांसाठी अविरतपणे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.