नागपूर (वृत्तसंस्था) सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. महाविकास आघाडी सरकारने 365 दिवसांत जनतेच्या अपेक्षांचा मोठा भंग केला आहे. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं. त्यामुळे राज्यात वर्षभरातच जंगलराज निर्माण झालं आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
‘कुंभकर्ण आज असता तर आत्महत्या केली असती की आमच्यापेक्षाही कुणी मोठा भाऊ आहे’ अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात कोरोनापासून ते मराठा आरक्षण आणि वाढील वीजबिलाविरोधात विरोधक पेटून उठले आहे. याच मुद्द्यांवर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. ते नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली. गजनीच्या हिरेसारखा या सरकारला पॅालीटीकल अल्झायमर झाला आहे. या सरकारविरोधात संधी मिळेल तिथे जनतेनी असंतोष व्यक्त करा असंही यावेळी मुनगंटीवार म्हणाले. इतकंच नाही तर ‘फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले’ असं म्हणत मुनगंटीवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकारकडून चांदा ते बांदाच्या लोकांना न्याय प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती. सरकारने हा अपेक्षाभंग केला आहे, असं सांगतानाच मंत्रिमंडळाची यादी आपण वाचतो. तेव्हा पहिलं नाव U पासून सुरु होतं आणि शेवटचं नाव आदिती सुनील तटकरे म्हणजे A वर संपतं. जशी बाराखडी मंत्रिमंडळात उलटी झाली तसं यांचं कामंही उलटं झालं आहे. उलट्या बाराखडीसारखं एक वर्ष उलटंसुलटं काम करणारं सरकार आपण अनुभवतोय, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.