धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या वृद्धाचे पैसे लांबवून पलायन करणाऱ्या दोन युवकांना धरणगाव पोलिसांनी पकडल्याची घटना गुरुवारी घडली.
वाघळूद बुद्रुक येथील अशोक त्र्यंबक पाटील (७६) हे १६ हजार रुपये घेऊन धरणगाव येथील बैल बाजारात बैल घेण्यासाठी आले होते. परंतु बैल पसंत न पडल्याने ते धरणगाव बस स्थानकातून पिप्री खुर्दकडे जाणाऱ्या बसमध्ये चढले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये गायब आहेत. त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांना दोन युवक पळताना दिसले. त्यांनी आरडाओरड केली असता बस स्थानकावर हजर असलेले हवालदार संजय सूर्यवंशी व समाधान भागवत यांनी त्या चोरांचा पाठलाग केला. दोघं चोरट्यांना धरणगाव बस स्थानकामागील अर्बन बँकेजवळ पकडण्यात यश आले.
याप्रकरणी अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून इमरान युसुफ भिस्ती (२५, रा. लक्ष्मी नगर कानळदा रोड, जळगाव) तसेच शेख गुलबाज शेख अशपाक (२३, रा. सिंधी कॉलनी जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.