जळगाव (प्रतिनिधी) एका नामांकीत फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर विमा काढण्याचे सांगत प्रौढाला ९ लाख १५ हजार ९८ रुपयांत ऑनलाईन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव येथे जीवनराम कुमावत हे व्यापारी वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत दि.२७ मार्च ते २६ सप्टेंबर या काळात मीनाक्षी अग्रवाल, आलिया, रुही शर्मा, सुधीर सक्सेना असे नाव सांगणाऱ्या चार अनोळखी इसमांनी संपर्क साधला. तसेच त्यांना एका नामांकीत कंपनीचे नाव सांगून कर्ज मिळवून देतो, असे अमिष दाखवित त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कर्जासाठी त्यांना याच कंपनीसह व अन्य कंपनीचे विमा काढण्यास भाग पाडले.
दि. २७ मार्च २०२३ ते दि. २६ सप्टेंबर २०२३ या दरम्यान कुमावत यांच्याकडून वरील चार जणांनी वेळोवेळी एकूण ९ लाख १५ हजार ९८ रुपये ऑनलाईन घेतले. मात्र त्यांना त्या बदल्यात कोणतेही कर्ज मंजूर करून दिले नाही. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे कुमावत यांना समजले. त्यांनी लागलीच सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.