धरणगाव (प्रतिनिधी) येथील तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यात ९ ग्रामपंचायत बिनविरोध असल्याने ३८ ग्रामपंचायत च्या निवडणुका संपन्न होत आहे. मतदान यंत्रणेसाठी जवळपास ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी तालुका ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.
आज सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान साहित्य घेण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना बोलवले होते. मकर संक्रांतीच्या दिवशी निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना यावे लागले असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवले व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मकर संक्रांतीनिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन तिळगुळ वाटप करून कर्मचाऱ्यांमध्ये गोडवा आणला. यावेळी निवडणुकीच्या कामकाजावर निमित्ताने आलेल्या कर्मचाऱ्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन तिळगुळ वाटले. निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी १६ झोन तयार करण्यात आले असून १६ झोन साठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. धरणगाव तालुक्यात एकूण १२२ मतदान केंद्र तयार करण्यात आली असून निवडणूक लढवणारे एकूण उमेदवार ७३१ आहेत त्यात पुरुष ३०४ तर स्त्रिया ४२७ उमेदवार रिंगणात आहेत तसेच तालुक्यातील एकुण मतदार संख्या ६१ हजार ३८० असून त्यात पुरुष ३१ हजार ८४४ तर स्त्रिया २९ हजार ५३६ आहेत. त्यासाठी मतदान यंत्रणेसाठी जवळपास ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी धरणगाव तालुका ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज झालेला दिसून येत आहे