धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खर्दे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्राथमिक शिक्षक रवींद्र रतिलाल बोरसे (वय ५१, रा. धुपे खुर्द तालुका चोपडा, BLO) यांचे आज मतदान केंद्रावर हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे.
रवींद्र रतिलाल बोरसे प्राथमिक शिक्षक हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्दे बु. ता. धरणगाव येथे सेवेत होते. त्यांच्या नियुक्तीच्या शाळेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) पदाचे मतदान केंद्र क्रमांक १०४ सुसूत्रीकरण विषयक कामकाज करीत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले असता, त्यांची प्राणज्योत मालविल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, आज सकाळपासून तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे विविध गावांना भेटी देऊन आढावा घेत होते. परंतू खर्दे येथे जाण्याआधीच दुर्दैवी बातमी समोर आली. बोरसे यांच्या निधनाने जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक संबंधित जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दुःख व्यक्त केले आहे.