धुळे (प्रतिनिधी) ट्रकवरील ताडपत्री लावत असताना वरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याने तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. रोहित दीपक अहिरे (वय २३, रा. धरणगाव, जि. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, धरणगाव येथून निघालेला ट्रक धुळे मार्गे सोनगीरकडून निजामपूरकडे जात होता. या ट्रकमध्ये चालक सुल्तान अहमद शेख ऊर्फ मुसा हे आणि रोहित अहिरे हे दोघे ट्रकमधून जात होते. शनिवारी ट्रक चाळीसगाव चौफुलीवर आल्यानंतर ट्रकची ताडपत्री निघालेली असल्याचे दिसून आली. ती लावण्यासाठी ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आला. ट्रकची ताडपत्री लावण्यासाठी रोहित हा ट्रकवर चढला. परंतू ताडपत्री लावत असताना तो थुंकण्यासाठी वाकला. त्याचवेळेस त्याचा झोल गेल्याने तो ट्रकवरून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचार सुरु असताना डॉक्टरांनी रोहितला मृत घोषित केले. आझादनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.