मुंबई (वृत्तसंस्था) मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. त्यांना आज पहाटेच्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टचा झकटा आला. त्यातच पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचं निधन झालं.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाशय धर्मपाल गुलाटी MDH चे मालक होते. अनेकदा त्यांचे फोटो आपण MDHच्या मसाल्यांचा पाकिटावरही पाहिले असतील. त्यांच्या वडिलांनी सध्याचं पाकिस्तान पण त्या काळात असलेलं सियालकोट इथे १९१९ साली पहिल्यांदा मसाल्यांचा एक छोटा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर गुलाटी कुटुंबीय दिल्ली ला आले. सुरुवातील त्यांनी कुटुंब चालवण्यासाठी टांगाचालक म्हणून देखील काम केलं होतं. थोडे पैसे जमल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी लाकडाच्या लहान पेटीतून मसाले विकण्यास सुरुवात केली आणि हा व्यवसाय पुढे वाढवत नेला. आजमितील MDH मसाले भारतात सर्वात प्रसिद्ध आणि त्यातही लाल तिखट आणि काश्मीरी तिखट देखील खूप प्रसिद्ध आहे.