धुळे (प्रतिनिधी) तालुक्यातील नकाणे गावाच्या अलीकडे असलेल्या बालाजी नगरात एका महाविद्यालयीन तरुणीचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. मारेकऱ्याने तरुणीचा गळा चिरल्यानंतर पोटावर तीन ठिकाणी वार केले होते. निकिता कल्याण पाटील (वय २२), असे मृतक तरुणीची नाव आहे.
घर मालकाला किंचाळण्याचा आला आवाज !
नकाणे (ता.धुळे) गावाच्या अलीकडे विघ्नहर्ता हॉस्पीटलमागे बालाजी नगरात राहणारी निकिता पाटील ही तरुणी काल (दि.२२) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातील बेडरुममध्ये एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन अज्ञात कारणावरुन धारदार चाकूने तिचा गळा चिरुन पोटावर तीन ठिकाणी सपासप वार केले. यामुळे तरुणी जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर संबंधित व्यक्ती घराबाहेर पळून गेली.
घर मालकाला आला किंचाळण्याचा आवाज !
या घरासमोरच नवीन घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी घराला पाणी देत असतांना संबंधित घर मालकाला किंचाळण्याचा आवाज आला. यामुळे ते तरुणीच्या घराकडे पळाले. बेडरुममध्ये बघितले असता तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. त्यांनी आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. नागरिकांनी तिच्या आई-वडीलांसह भावाला भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. काही वेळातच ते तिघे घरी परतले. मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच त्यांनी टाहो फोडला.
श्वान पथकाला केले पाचारण !
श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने घरापासून काही अंतरावर माग दाखविला. तसेच न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे पथकही दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या ठिकाणी खुनासाठी वापरलेला चाकू मिळून आला. पंचनाम्यानंतर तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला.
खुनाचे कारण अस्पष्ट !
दरम्यान, पाटील कुटुंबिय सहा महिन्यांपूर्वीच नवीन घरात वास्तव्यास आले होते. निकिता ही टीवायबीएचे शिक्षण घेत होती. तिचे वडील चालक असून भाऊ देखील खाजगी ठिकाणी कामाला जातो. आई दोन ते तीन घरांमध्ये स्वयंपाक करण्याचे काम करते. सायंकाळी ५.४५ वाजता तिची आई कामासाठी घराबाहेर पडली. त्यामुळे निकिता घरात एकटी होती. ही संधी साधून अज्ञात मारेकऱ्याने अज्ञात कारणाने तिचा खून केला. पोलिसांनी दोघांवर संशय व्यक्त केला असून तपासाला गती दिली आहे. संशयिताच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यास अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.