जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. अशा परिस्थितीत तिबार पेरणी करूनही खरीप हंगामातील पिके जळून गेली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकार आणि महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून आर्थिक मदत जाहीर करावी म्हणून जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला थेट रक्ताने सह्या केलेले निवेदन आज दिले.
पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, मका, ज्वारी, बाजरी तसेच उडीद, मूग आणि सोयाबीन यासारखी पिके करपली आहेत. आता पाऊस आला तरी पिकांना काहीही फायदा होणार नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. पूरग्रस्त नागरिकांना ज्याप्रमाणे मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले, त्याच धर्तीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीही मदतीचे पॅकेज द्यावे. थकीत वीजबिल माफ करावे, जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात, अशा मागण्या निवेदनात शेतकऱ्यांनी केल्या आहेत.