मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या अनेक दिवसांपासून कोठडी मुक्कामी असणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजायची मशीन (Money Counting Machine) सापडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या पैशातून मालमत्ता घेतल्याचाही आरोप
सरकारी वकील यांनी कोर्टात युक्तीवाद केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून गुणरत्न सदावर्ते यांनी मालमत्ता घेतल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. सरकारी वकील प्रदीप घरत हे कोर्टात सध्या सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. तर सदावर्तेकडून अनेक वकीलांनी युक्तीवाद केला आहे.
कुठे कुठे मालमत्ता घेतल्याचा आरोप ?
परळमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशातून 60 लाखांची जागा घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच याच पैशातून सदावर्ते यांनी भायखळ्यातही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय. गुणरत्न सदावर्ते यांनी याच पैशातून नवीन गाडी खरेदी केल्याचेही सरकारी वकीलांनी कोर्टातील युक्तीवादादरम्यान म्हटले आहे. याची चौकशी करण्यासाठी पोलिसांना आणखी कोठडी हवी असल्याचीही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावेळी मागणी केली.
पोलीस तपासात सहकार्य नाही
सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात काही एसटी कर्मचाऱ्यांनीही सदावर्तेना पैसे दिल्याचा दावाही केला होता. तर सदावर्ते हे पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीत. ते त्यांचा मोबाईलही देत नाही, असेही प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले आहे. तर पवारांच्या घराबाहेरील आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावतेंना उद्या कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर इतर आरोपींची कोठडीही कोर्टाने वाढवली आहे.