कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापूर जिल्ह्यातून एक किळसवाणा व संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिकारीसाठी कोकणातून कोल्हापूरात आलेल्या एका शिकाऱ्याने घोरपडीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या मोबाईलमधून घोरपडीवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ सापडले आहेत.
काही शिकारी कोकणातून कोल्हापुरातील चांदोलीमध्ये शिकारीसाठी आले होते. व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कमेर्यामुळे या शिकारींना अटक करण्यात वनविभागाला यश मिळालं होतं. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींचे मोबाईल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. यातील एका आरोपीने घोरपडीवर बलात्कार केला असून त्यावेळचे चित्रिकरण मोबाईलमध्ये करण्यात आले होते. आता त्यावरुनच या आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र वनविभागासमोर एकच प्रश्न आहे तो म्हणजे या आरोपींवर कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंद करायचा. संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनिल कामतेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. एखादा शिकारी आला तर, त्याने शिकार केली तर त्याच्यावर कोणत्या कलमांतर्गत कारवाई करायची हे ठरलेलं असतं. पण आता वन्यप्राण्यावर बलात्कार केल्यामुळे कशी कारवाई करायची हा पेच वन्य अधिकाऱ्यांसमोर आहे.