मुंबई (वृत्तसंस्था) दिशा सालियनची ८ जूनला बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. तिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक तैनात होते. असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणाला नव्याने वाचा फोडली. ते आज मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दिशा सालियन हिने आत्महत्या करण्याचे कारणच नव्हते. दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने तिला जबरदस्तीने पार्टीला बोलावले. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी संबंधित फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला. सात महिने उलटून गेल्यानंतरही दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. दिशा सालियनच्या इमारतीच्या वॉचमनकडे असणाऱ्या रजिस्ट्रारमधील पानं कोणी फाडली, कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला यामध्ये इतका रस होता, असे अनेक सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
ही गोष्ट सुशांत सिंह याला समजली तेव्हा त्याने मी कोणालाही सोडणार नाही, असे म्हणायला सुरूवात केली. त्यावेळी काहीजण त्याच्या घरी गेले. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर सुशांत सिंह याची हत्या झाली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी सुशांत सिंह याच्या घराबाहेर होती? सुशांत सिंह याच्या इमारतीत सीसीटीव्ही होते. परंतु, सुशांतच्या हत्येनंतर हे सीसीटीव्ही गायब झाले. सुशांतचा मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी ठराविक व्यक्तीची रुग्णवाहिका कशी आली? सुशांतचा मृतदेह रुग्णालयता कोणी नेला? त्यानंतर पुरावे कोणी नष्ट केले. या सगळ्या तपासात कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता, याची आम्हाला माहिती आहे. मी हे सगळे पुरावे संबंधित तपास यंत्रणांना देईन. त्यामुळे सुशांत सिंह आणि दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास पुन्हा सुरु होऊ शकतो, असे नारायण राणे यांनी सांगितले.
रमेश मोरे आणि जया जाधव यांची हत्या कोणी केली, हे आम्हालाही माहिती आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले. जया जाधव हा साधा माणूस होता. त्याच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांनी वॉर्डात फोन केला होता, असा आरोपही नारायण राणे यांनी केला. महाराष्ट्रात विकासाच्या आणि इतर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व वाद सुरु असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटले.