जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या चार उमेदवारांनी जाहीर माघार घेतली आहे. आता या पॅनलमध्ये केवळ ४ उमेदवारच शिल्लक राहिले आहे. दरम्यान, यामुळे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलची बहुमताहून अधिक जागा जिंकण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये स्थान न मिळाल्याने भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या असंतुष्टांनी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी केली होती. शेतकरी विकास पॅनलने ८ जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही प्रमाणात टक्कर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा पूर्णपणे गेम केल्याने या जागेवर काँग्रेसला पीछेहाट करावी लागली. तसेच शेतकरी विकास पॅनलकडून चौपड्याची जागा सुरेश पाटील हे लढतील असा दावा केला होता. मात्र, सुरेश पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे विकास पवार, विकास वाघ, अरुणा पाटील रवींद्र पाटील हेच शेतकरी विकास पॅनलमध्ये शिल्लक आहेत. मात्र, या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तुल्यबळ लढत द्यावी लागणार आहे.
पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त दाखवून माघार घ्यावी : अॅड. पाटील
जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे पॅनल तयार झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे. त्या पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त दाखवून माघार घ्यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी दिला आहे.