जळगाव (प्रतिनिधी) मतदारांपुढे जाऊन त्यांना हात जोडून मते मागण्याचा कंटाळा महाविकास आघाडीतील नेत्यांना आहे. मतदारांचे तोंडच बघायचे नसल्याने ही निवडणूक बिनविरोध करायचे प्रयत्न सुरू होते. मात्र, शेतकरी विकास पॅनलले आव्हान दिल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाइलाजाने मतदारांपुढे जावे लागणार आहे, अशी टीका कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत डी. जी. पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत कॉग्रेसने राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलाय. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडेच राहावे म्हणून जागावाटपासह इतरही काही जागांवर दावेदारी करून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा ठरवून गेम केला.
यावेळी उमेदवार विकास पवार, विकास वाघ, अरुणा पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील उपस्थित होते. डी.जी. पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीने केवळ आणि केवळ बँकेचे अध्यक्षपद डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचा पोपट केला आहे. सत्तेत वाटा म्हणून कॉग्रेस बँकेत कोणतेही पद मागू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे मूळ उमेदवारच नाहीत. ज्यांना उमेदवारी दिली ते काँग्रेस नाममात्र सदस्यदेखील नाहीत पॅनलमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना मिळालेली वागणूक लाजिरवाणं आहे. महाविकास आघाडीपेक्षा शेतकरी विकास पॅनलमध्ये कॉग्रेस उमेदवार जास्त असल्याचा दावा त्यांनी केला.