जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जळगाव येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आपल्या वाटचालीची पन्नास वर्षे पूर्ण करून ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ती निमित्त या संघाने सुमारे ८० कोटी रुपये खर्चाचा अत्याधुनिक विस्तारित प्रकल्प अलीकडेच उभारला असून त्याचा उदघाटन सोहळा शुक्रवारी (१७ डिसेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते करीत आहे.
एखाद्या शेतकऱ्यांच्या संस्थेने आपला सुवर्ण महोत्सव अत्याधुनिक प्रकल्पाच्या उदघाटनाने करण्याचं हे जिल्ह्यातील एकमेव उदाहरण म्हणता येईल. विशेषतः अलीकडे काही सहकारी संस्था व तिचे प्रकल्प डबघाईस येत असताना जिल्हा दूध संघाची ही कामगिरी मोठी आश्वासक तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यां प्रति बांधिलकी दर्शवणारी आहे. जिल्हा दूध संघ हा आज च्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केवळ संस्था नसून आर्थिक श्वास ठरतोय.
दूरदृष्टीच्या नेतृत्वाची फलश्रुती
जळगावच्या सहकारी दूध संघाची वाटचाल पन्नास वर्षांची असली तरी खरे स्थैर्य व विकासाची निश्चित दिशा सहा वर्षा पूर्वी तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्यानेतृत्वा खाली कार्यान्वित झालेल्या संचालक मंडळाने निश्चित केली. कोणताही पक्षीय भेदाभेद किंवा पक्षीय अभिनिवेश न बाळगता निर्वेध वाटचाल करीत आहे. त्याचीच फल; निष्पत्ती म्हणून नवीन अत्याधुनिक प्रकल्प उभा राहू शकला आहे. गेल्या सहा वर्षातील कामगिरीकडे दृष्टीक्षेप टाकला असता लक्षणीय प्रगतीचा टप्पा या संघाने गाठला आहे. शेतकऱ्यांसाठी पूरक उद्योग नव्हे, तर फायद्याचा उद्योग म्हणून संघाने सिद्ध केले आहे.
संघाच्या १९९० ते १९९५ पर्यन्त च्या काळाचे अवलोकन केल्यास संघाचं कार्य आणि व्यवस्था पन बऱ्याच अडचणींना तोंड देत मोडकळीस येतो की काय, अश्या अवस्थेत आलं होतं. तत्कालीन शासनाच्या निर्णया नंतर एन.डी.डी. बी.ने संघाची सूत्रे घेत संघाचा प्रकल्प यशस्वीरीत्या सावरण्याचा प्रयत्न केला. १९९५ ते २०१५ या काळा पर्यंत एन.डी.डी.बी.चं प्रशासक मंडळ कार्यरत होत.त्या नंतर २०१५ मध्ये संघाची निवडणुक झाली आणि श्री.खडसे यांच्या पुढाकाराने नवीन संचालक मंडळ कार्यन्वित झाले. श्री.खडसे यांच्या पत्नी सौ.मंदाताई खडसे चेअरमन झाल्या व त्यांनी ही संघाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. संघाचा जो विस्तारित आधुनिक प्रकल्प आज उभारला आहे, हे माजी मंत्री श्री.खडसेंच्या प्रभाव व दूरदृष्टी चा परिपाक आहे. विस्तारित प्रकल्पामुळे दूध संकलन क्षमता ५ लाख लिटर पर्यंत असणार आहे, गेल्या वर्ष भराचे दूध संकलन सरासरी प्रतिदिन २ लाख ६० हजार लिटर पेक्षा जास्त राहिले आहे.तर संघाचे ‘ विकास ‘ दूध व दुधजन्य पदार्थाच्या विक्रीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक विकासात मोठा वाटा असून जळगाव सह जिल्हाभरात ‘ विकास ‘ दूध विक्री केंद्रा च्या माध्यमातून २० हजार गरजू व तरुणांना कायम चा रोजगार मिळाला, तर २०० पेक्षा जास्त टँकर, ट्रक, मेट्याडोर, पिकअप व्हॅन आदी वाहनांना दररोज वाहतूक व्यवसाय मिळतो आहे. संघाला दररोज दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्था ची संख्या ६५० पेक्षा जास्त असून त्यापैकी १३१ महिला संस्था संघाच्या सभासद संस्था आहेत.
संघाच्या ठेवीत लक्षणीय वाढ
जिल्हा दूध संघावर दूध उत्पादक संस्था आणि शेतकरी सभासदांचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज संघाकडे 37 कोटींच्या ठेवी जमा आहेत. प्रशासकीय काळा शी तुलना करता ठेवीची रक्कम दुप्पट आहे, ही किमया व विश्वास गेल्या सहा वर्षातील सचोटीच्या कामाची पावतीच म्हणता येईल. सध्याची स्थिती पहाता संघाची वाटचाल आत्मनिर्भरते च्या दिशेने सुरू असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
प्रतिष्ठा अन आत्मसन्मान
श्री. खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळात एक वाक्यता असल्याचे अनुभवास येत आहे, कारण गत सहा वर्षात संघाची मासिक सभा असो की वार्षिक सभा कधी ही किरकोळ कुरबुरी किंवा मत भिन्नता, वाद ऐकण्यात आलेले नाही. एकमेकांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान राखला गेल्यामुळेच एक वाक्यता असावी. माजी खासदार ऍड. वसंतराव मोरे उर्फ मोरे काका हे संघातील सर्वात ज्येष्ठ संचालक म्हणून त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून प्रभारी चेअरमन म्हणून जबाबदारी श्री.खडसे यांनी सोपविली ही देखील ज्येष्ठ संचालका प्रति असलेला आदर व विश्वासाचे प्रतीक म्हणावे लागेल.
सुरेश उज्जैनवाल
पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४