जळगाव दिनांक ०८ (प्रतिनिधी) : गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५३ वर्षात ते १४ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हे धरण १००% धरण भरल्याने सिंचनाचे आवर्तन या वर्षी गिरणा धरणातून सिंचानासाठी ३ तर बिगर सिंचनासाठी ४ असे एकुण ७ आवर्तने पाण्याच्या उपलब्धते नुसार व मागणी नुसार डिसेंबर २०२४ , फेब्रुवारी , एप्रिल व जून २०२५ या महिन्यात ७ आवर्तने सोडण्यात येणार असल्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी पाणी वापर हा काटकसरीने करून गिरणा प्रकल्पावरील कालवा प्रणालीवरील अनुषंगिक बांधकामे, माती भराव यासह दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावी, गिरणा कालवा प्रणालीची कामे ६० वर्षांपूर्वी झाली असल्याने “कालवा प्रणालीचा नुतनीकरणाचा प्रस्ताव “ शासनास सादर करावा तसेच जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई उपाययोजना बाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हास्तरीय कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा विश्रामगृहात घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.*
जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून यावर १३८ गावे अवलंबून आहेत.तर, बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा आणि गुळ या मध्यम प्रकल्पांवर १०१ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो. अर्थात, तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील विभागाने सुचविल्या प्रमाणे पाणी आरक्षणाला या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.
सिंचन व बिगर सिंचन पाणी वापर
गिरणा प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालामध्ये सिंचनाव्यतिरिक्त कुठल्याही बाबींसाठी पाणी वापराची तरतूद केलेली नाही. तथापि बदलत्या परिस्थितीनुसार बिगर सिंचनासाठी शासनाने वेळोवेळी मंजुऱ्या दिलेल्या आहेत. गिरणा प्रकल्पा अंतर्गत पिण्यासाठी अवलंबून असणाऱ्या संस्थामध्ये मालेगाव महानगरपालिका, चाळीसगाव, भडगाव व पाचोरा नगरपालिका तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या २ योजनांचा समावेश असून चाळीसगाव, भडगाव , पाचोरा व एरंडोल तालुक्तायातील १५४ गावांचाही समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाण्याची बचत करून विभागाने पाणी टंचाई बाबत सूक्ष्म नियोजन करून बिगर सिंचनाची थकबाकी वसुली करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
यांची होती उपस्थिती जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती आणि कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा विश्रामगृहाच्या सभागृहात जळगांव येथे घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण संतोष भोसले, पाटबंधारे विभागाचे तुषार महाजन,, मध्यम प्रकल्पाचे अभियंता आर . टी. पाटील, मजिप्रा उप अधिक्षक अभियंता रविंद्र ठाकूर, उपकार्यकारी अभियंता मनोहर चौधरी आणि उपकार्यकारी अभियंता सुभाष चव्हाण, सिद्धार्थ पाटील, विजय जाधव व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
बैठकीचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता सुभाष चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता संतोष भोसले यांनी सिंचन पाणी अवर्ताना संदर्भात सविस्तर माहिती विशद केली .
गिरणा प्रकल्पावरील सिंचन व बिगर सिंचनची मागील वर्षाची व चालू वर्षाची पाणीपट्टी थकबाकी वसुलीबाबतही बैठकीत चर्चा झाली. आभार कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल साहेब यांनी मानले.