धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सात वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना किशोर दिवाळी अंकाची दिवाळी भेट डॉ. सोनवणे यांच्या हस्ते जवळ जवळ ५० विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पोटाची भूक शमविण्यासाठी जसा दिवाळीतील फराळ खातो तसंच आपली वैचारिक भूक शमविण्यासाठी आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत उत्तमोत्तम पुस्तके वाचा, फराळ आपलं शरीर जगवेल तर पुस्तके हे आपल्याला जीवन जगायला शिकवतील असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी केले.
यावेळी शाळेतर्फे बालभारतीच्या सुवर्णमहोत्सवी किशोर या मुलांच्या दिवाळी अंकाची दिवाळी भेट डॉ. सोनवणे यांच्या हस्ते जवळ जवळ ५० विद्यार्थ्यांना देण्यात आली. पाठ्यपुस्तक मंडळाचे अभ्यास गट समितीचे माजी सदस्य बापू शिरसाठ यांच्या संकल्पनेतून ही भेट योजना राबविण्यात आली असून शाळेतील शिक्षकांनी दातृत्वाच्या भावनेतून या योजनेसाठी किशोरचे अंक विकत घेऊन ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन बापू शिरसाठ यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक डी. के. चौधरी आणि उमाकांत बोरसे यांची मंचावर उपस्थिती होती.